शहरात मोटारसायकल चोरीची मालिका
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव,सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदूरगावातील किरण बाळू कड (रा.एनएमसी गार्डन) यांची स्प्लेंडर एमएच १५ सीडब्ल्यू ०६७७ शुक्रवार (दि.७) रोजी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंग मध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत. दुसरी घटना जिल्हा रूग्णालयातील ओपीडी पार्किंग भागात घडली. कामटवाडे येथील रामपरमेश बनवारीलाल यादव (रा.कार्तिकेय नगर) हे १९ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात गेले होते. ओपीडी पार्किंगमध्ये त्यांनी आपली अॅक्टीव्हा दुचाकी एमएच १५ ईआर ५०४४ पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक धुळे करीत आहेत. तर सोपान मोतीराम मोरे (रा.सुखदेवनगर,पाथर्डी गाव) यांची पॅशन मोटारसायकल एमएच १५ ईझेड २५६४ गेल्या मंगळवारी (दि.२५) रात्री गौतम दोंदे यांच्या किराणा दुकानासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.
….
किरकोळ कारणातून एकावर चाकू हल्ला
नाशिक : किरकोळ कारणातून सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी भावाच्या मदतीस धावून आलेल्या एकावर दोघांनी चाकू हल्ला केल्याची घटना गांधीनगर भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल खरात आणि सुमीत खरात अशी चाकू हल्ला करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुलतान बाबू शेख (२३ रा.नुराणी गल्ली,भारतनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गांधीनगर येथील एलआयजी सोसायटीत हा वाद झाला. सुलतान शेख व बबलू शेख या दोघा भावांना गुरूवारी (दि.२७) रात्री खरात बंधूनी गाठून चाकू हल्ला केला. बबलू शेख याच्याशी संशयीत खरात बंधू सिगारेट आणण्याच्या कारणातून वाद घालत होते. यावेळी त्यांनी शिवीगाळ करीत बबलू शेख यास मारहाण केल्याने सुलतान शेख आपल्या भावाच्या मदतीस धावून गेला असता सुमीत खरात याने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत सुलतानच्या हातास व डोक्यास दुखापत झाली असून अधिक तपास हवालदार मुन्तोडे करीत आहेत.
……