नाशिक : फळ विक्रीच्या वादातून त्रिकुटाने घरावर दगडफेक करीत एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना जेलरोड भागात घडली. यानंतर टोळक्याने आपला मोर्चा फळविक्री गाड्यांकडे वळवून गाड्या पेटवून दिल्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल चाफळकर, पापा चाफळकर आणि अभिजीत कु-हाडे (रा. सर्व महाजन हॉस्पिटल मागे जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शेख रियाज अब्दुल गनी (५२, रा. मगरचाळ, कॅनलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रियाज शेख यांचा मित्र सलमान खान याच्याशी फळविक्रीच्या वादातून संशयितांचा वाद झाला होता. सलमान खान हा रियाज शेख यांच्या घरात राहत असल्याच्या संशयातून रविवारी (दि.१८) रात्री संशयीतांनी शेख यांचे घर गाठून शिवीगाळ करीत घरावर दगडफेक केली. यावेळी शेख जाब विचारण्यासाठी घराबाहेर आले असता संशयीतांपैकी एकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत शेख यांच्या हातास दुखापत झाली आहे. यानंतर दुचाकीवर पसार झालेल्या त्रिकुटाने सलमान खान आणि मोबीन खान याच्या नोटप्रेसच्या भिंतीजवळ उभ्या केलेल्या कलींगड विक्रीच्या गाड्यांकडे आपला मोर्चा वळवून त्या पेटवून दिल्या.अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.