नाशिक : कालीकानगर कारमधून आलेल्या चार जणांनी एका युवकाला बेदम मारहाण करत चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत तरूण गंभीर जखमी झाला असून संशयीतांना पोलीसांनी गजाआड केले आहेत. तर संशयीतांनीही जखमी विरूध्द तक्रार दिली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा परस्परविरोधी दाखल करण्यात आले आहे.
अटक केलेल्या संशय़ितांमध्ये अवि विधाते, निखील मोटकरी,प्रशांत विधाते व दिलीप विधाते (रा.सर्व कालिका मंदिरामागे,विधातेनगर) ही नावे आहेत. याप्रकरणी किरण सुभाष भामरे (२७ रा.कालिका नगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. भामरे बुधवारी सकाळच्या सुमारास कालिकानगर भागात उभा असतांना कारमधून आलेल्या संशयीतानी संदिप विधाते यास मारहाण केली. या घटनेत टोळक्याने कारमधील लोखंडी चॉपर काढून वारही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्यात भामरे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत. तर संदिप धनाजी विधाते (रा.विधातेनगर) याने दिलेल्या तक्रारी नुसार मंगळवारी (दि.१५) मित्र गणेश शिंगार याच्या समवेत कालिका मंदिराच्या पाठीमागील व्यायामशाळे समोरून जात असतांना किरण भामरे याने हटकले. यावेळी संशयीताने मद्यसेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी केली असता त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या भामरे याने शिवीगाळ करून लोखंडी पाईपाने मारहाण केल्याचे म्हटले असून यात तो जखमी झाला आहे. अधिक तपास हवालदार म्हैसधुने करीत आहेत.