नाशिक – गडकरी चौकात असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांचे निवासस्थान असलेल्या गोदावरी बंगल्यात शिरून तस्करांनी आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडकरी चौक या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयास लागून असलेल्या गोदावरी बंगल्यात शिरून चोरट्यांनी आवारातील सुमारे १५ ते २० वर्षाचे चंदनाचे झाड कापून नेले आहे. याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील अंमलदार अमोल बर्वे यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी तपास करीत आहेत. दरम्यान या बंगल्यास २४ तास कडेकोट बंदोबस्त असतांना बुधवारी चोरट्यांनी हे झाड कापून नेले.
दरम्यान त्र्यंबकेश्वर रोडवरील आयटीआय नजीकच्या पोस्ट कार्यालयातही बुधवारी रात्री चंदन तस्करांनी प्रवेश करीत चंदनाचे झाड कापून नेले. याप्रकरणी प्रमोद आहेर (रा.हनुमानवाडी) यांनी तक्रार दाखल केली असून, सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.