नाशिक – आगरटाकळी येथे संतप्त जावयाने आपल्या सास-यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. काम धंदा शोधण्याचा सल्ला दिल्याने जावयाने ही मारहाण केली. या घटनेत सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटल्याने सासरे जखमी झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी जावयास अटक केली आहे.
रामचंद्र सुभाष कांबळे (रा.समतानगर,आगरटाकळी) असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी संशयीताची सासू वंदना खरात यांनी तक्रार दाखल केली असून या घटनेत सासरे विजू अशोक खरात (४२ रा.समतानगर)जखमी झाले आहेत. कांबळे हा आपल्या कुटुंबियासह सासरवाडीला राहतो. सोमवारी रात्री कुटुंबिय गप्पा मारत असतांना ही घटना घडली. गेल्या वर्षभरापासून तुम्ही काही एक काम करीत नाही. आम्ही किती दिवस पोसायचे असे म्हणून सासरे विजू खरात यांनी कामधंदा शोधण्याचा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या जावयाने सास-यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत त्याने सास-याचे घरासमोरील सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटल्याने ते गंभीर जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.