नाशिक : दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे दुस-याची शेतजमिन परस्पर स्व:ताच्या नावे केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात १७ जणांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर गंगाधर नाठे (रा.चांदोरी ता.निफाड) व अन्य १७ जणांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तानाजी एकनाथ दाते (रा.माडसांगवी ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. दाते यांच्या मालकीची शिलापूर ता.जि.नाशिक शिवारात गट नं. ६६ – १ – १ यामध्ये क्षेत्र ०७८ आर एवढी शेतजमिन आहे. सदर जमिनीचे संशयीत नाठे व त्याच्या साथीदारांनी खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून स्व:ताच्या फायद्यासाठी परस्पर हे क्षेत्र स्व:ताचे नावे करून घेतले. याबाबत दुय्यम निरीक्षक कार्यालयात ११ नोव्हेंबर १९९७ रोजी नोंदणी करण्यात आली. याबाबत दाते यांनी पोलीसांचे उंबरठे झिजवले मात्र न्याय न मिळाल्याने त्यांना न्यायालयात धाव घेतली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात याबाब सुनावणी झाली असता न्यायालयाने संबधीतावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले असून त्यानुसार फसवणुकीसह विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.