नाशिक – मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे ७१ हजार रुपयाचे २३ मोबाईल केले लंपास
नाशिक – महामार्गावरील मोकळ हॉस्पिटल भागात मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे ७१ हजार रूपये किमतीचे २३ मोबाईल लंपास केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश हरी अडसुळ (रा.पंचक,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. अडसुळ यांची मोकळ हॉस्पिटल भागात जय जनार्दन मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी टपरीचा पत्रा उचकटून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी विक्रीसाठी ठेवलेले विविध कंपनीचे सुमारे ७१ हजार ८० रूपये किमतीचे २३ मोबाईल चोरून नेले. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.
७८ हजार रुपयाची घरफोडी
नाशिक – हाडोळा भागात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ७८ हजार रुपये लंपास केले. यात ३५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण रविंद्र भालेराव (रा.मोरे चाळ,हाडोळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भालेराव कुटूंबिय मावशीच्या घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.१३) रात्री बंद घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली ३५ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.