बंगल्याच्या आवारातून चंदनाची चोरी
नाशिक : बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरट्यांनी कापून नेल्याची घटना शास्त्रीनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चंदन तस्करांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील जगदिश कुलकर्णी (रा.कुलप्रभा बंगला,शास्त्रीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२८) उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी कुलकर्णी कुटूंबिय घरात नसल्याची संधी साधून वॉल कंपाऊडची तार कापून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. यानंतर भामट्यांनी चंदनाच्या झाडाचा सहा फुट उंचीचा बुंधा कापून नेला. ही बाब परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून दोन तस्करांनी ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.
….
कुटूंबियास टोळक्याकडून मारहाण
नाशिक : हातातील पैसे हिसकावून घेत टोळक्याने एकाच बापलेकांसह एकास बेदम मारहाण केल्याची घटना देवळाली गावातील वडारवाडी चौकात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तीघांना अटक करण्यात आली आहे. अर्जुन उर्फ गंड्या रूंजा पवार,राहूल चंदू पवार,शाम रूंजा पवार,कैलास रूंजा पवार,काशिनाथ रूंजा पवार व चंदू पवार (रा.सर्व वडारवाडी,दे.गाव) अशी संशयीतांची नावे असून त्यातील कैलास पवार,काशिनाथ पवार व चंदू पवार आदींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मनोज सतिश सकट (२५ रा.सोमवार बाजार,देवळाली गाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मनोज सकट गुरूवारी (दि.२७) रात्री कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना वडारवाडी चौकात अर्जुन उर्फ गुंड्या पवार व राहूल पवार यांनी त्याची वाट अडवित हातातील पैसे हिसकावून घेतले. यावेळी मनोज सकट याने विरोध केला असता दोघांनी त्यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यानंतर मनोज याने घरी जावून आपबिती कथन केल्याने त्याचा भाऊ, वडिल,आते बहिण आणि गल्लीतील दिपक फासके आदी चार जण संशयीतांना जाब विचारणा करण्यासाठी गेले असतांना सहा जणांच्या टोळक्याने सर्वांना बेदम मारहाण केली. या घटनेत सकट बापलेकांसह फासगे आणि आतेबहिण जखमी झाली असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
….