नाशिक : तस्करांनी चंदनाची तब्बल पाच झाडे नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह आवारातूनच कापून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेल कर्मचारी गोपाल तुकाराम चौधरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या घटनेने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारागृहाच्या विस्तीर्ण आवारात हा प्रकार घडला असून रविवारी अज्ञात चोरट्यांनी जेलच्या सुरक्षा व्यवस्थेस चकवा देत बावळी बाग परिसरातील तब्बल ५ चंदनाची झाडी कापून नेली. कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांचे निवासस्थान भागात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून या घटनेने हजारो कैदी असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.