नाशिक – उपनगर येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीच्या बालिकांचा शोध श्वान पथकातील गुगलने घेतल्याचे काल वृत्त होते. पण, या चिमुरडीवर २८ वर्षीय संशयिताने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत व बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात संतापाची लाट पसरली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही दहा वर्षीय मुलगी आपल्या वडिलांसोबत रात्रीच्या वेळी चक्कर मारायला बाहेर गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला घराजवळ सोडले व ते कामानिमित्त बाहेर गेले. मात्र थोड्या वेळाने तिचे वडील घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली. पण, मुलगी भेटली नाही. त्यानंतर उपनगर पोलिस स्थानकात ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी नंतर शोध घेतला, पण मुलगी भेटली नाही. त्यानंतर रात्री उशिरा श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर या श्वान पथकातील गुगलने २० मिनिटात या चिमुरडीचा शोध घेतला. ही मुलगी परिसरातील एका गार्डन जवळ आढळून आली. ही चिमुरडी भेटल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.