नाशिक – नाशिकरोड येथील सिन्नर फाटा येथील हिरा वाईन शॉपमध्ये विक्री केलेल्या मालाबाबत संगणकाच्या नोंदीमध्ये फेरफार करून तीन नोकरांनी सुमारे ४० लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूक प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. डिसेंबर २०२० च्या सुरुवातीला दारुच्या बाटल्यांची झालेली विक्री व त्यांची आलेली रक्कम यात तफावत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा फसवणूकीचा प्रकार समोर आला. ही तफावत सुमारे ४० लाखांपेक्षा जास्त असल्याने मॅनेजर तरूण प्रितमदास सुखवानी यांनी सीए आणि ऑडिटर यांना याबाबत तपासणी करण्यास सांगितले. त्यांना देखील सुरुवातीला यामध्ये घोळ झाल्याचे लक्षात आले नाही. पण, दोन्ही संगणकांवरील माहितीची जुळवाजवळ करून पडताळणी केली असता. सेल्समन अविनाश खैरनार व मुसा शेख यांनी ही फसवणूक केल्याचे लक्षात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर सुखवानी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करून अविनाश खैरनार व मुसा शेख या दोन सेल्समनला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अशी की, फिर्यादी सुखवानी हिरा वाईन शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. या दुकानात अविनाश अनिल खैरनार (वय २५, रा. म्हसरूळ, नाशिक), मुसा अब्दुल शेख (वय ३५, रा. एकलहरा रोड, सिन्नरफाटा) हे आठ ते दहा वर्षापासून शॉपमध्ये सेल्समन म्हणून काम पाहात होते. सेल्समन अविनाश खैरनार व मुसा शेख हे दररोजचा हिशोब पाहून त्यात आलेली रक्कम बँकेत भरण्याचे काम करत होते. तसेच दुकानाच्या दारुबंदी बाबतचे सर्व अकाऊंट योगेश आनंदा खाडे (रा. दत्तमंदिर, नाशिकरोड) हे महिन्याच्या दर आठवड्याला तपासणी करत होते. या दुकानात दोन संगणक असून, त्यात दारु विक्री करताना सर्व बाटल्यांचे स्कॅनिंग देखील तेच करत होते. तसेच संगणकामध्ये स्टॉक, मालाच्या विक्रीबाबतचा ताळेबंद, साठवणुकीचे काम देखील हे दोघेच पाहात होते. परंतु दोन्ही संगणकांवरील माहितीची जुळवाजवळ करून पडताळणी केली असता. सेल्समन अविनाश खैरनार व मुसा शेख यांनी ही फसवणूक केल्याचे लक्षात आले.