नाशिक – क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून दोघा
तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकास घातला ५५ हजारांचा गंडा
नाशिक – जय भवानी रोड परिसरात भरदिवसा क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकास ५५ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश मारुतीराव काळे (वय ७४, रा. प्रथमेश बंगलो, भवानीनगर, आडकेनगर नंबर ३, जयभवानी रोड) हे शुक्रवारी दुपारी बारा वाजता नातीला शाळेतून घेऊन घरी परतत होते. यावेळी व्यंकटेश बंगल्यासमोर दोघा अनोळखी युवकांनी त्यांना हटकले. क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून हातातील अंगठ्या काढून खिशात ठेवण्यास सांगितलं. काळे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढल्या असता संशयितांनी मदतीचा बहाणा करत अंगठ्या रुमालात ठेवताना हातचलाखीने ५५ हजारांचा ऐवज हातोहात लंपास केला. उपनगर पोलिसांनी भादंवि कायदा कलम ४२०, १७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक लोंढे तपास करत आहेत.
४५ हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबडली
नाशिक – जुना आडगाव नाका परिसरातून जाणाऱ्या पादचारी महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबडल्याची घटना घडली आहे. हेमा दिंगबर कापसे (रा. घर क्र. ४३७९, गजानन चौक, पंचवटी) या शेजारी मंदाबाई अशोक धुमाळ यांच्यासह सायंकाळी पावणेआठ वाजता गुरुद्वारा रोडने गजानन चौकाकडे जात होत्या. दोघी वेताळबाबा मंदिरासमोर आल्या असता समोरुन काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोघे संशयित आले. त्यापैकी मागे बसलेल्याने सौ. कापसे यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे सोन्याची पोत खेचली. त्यानंतर दोघांनी धूम ठोकली. याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी पंचवटी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पटारे तपास करत आहेत.