नाशिक – स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर उड्डाणपूलावरून उडी घेत युवकाने केली आत्महत्या
नाशिक – बिटको चौकातील स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर उड्डाणपूलावरून उडी घेत एकाने आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत त्याच्या डोक्याला व हाताला तसेच दोन्ही पायाला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यास तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी कुटूंबियांनी त्यास अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. आर.बी.पाटील यांनी मृत घोषीत केले.
विकी संजय इंगळे (वय २१,म्हाडा वडाळागाव) असे मृत युवकाचे नाव आहे. इंगळे याने बुधवारी रात्री पूलावरून उडी घेतली होती.
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
नाशिक – सातपूरला श्रमिकनगर भागात राहणा-या २८ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शरद परमेश्वर खरात (वय २८, केदार गॅलक्सी गार्डन जवळ, श्रमिकनगर ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. खरात याने बुधवारी (दि.९) रात्री आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकमध्ये साडी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
शिवाजीनगरला घरफोडी, १६ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक – नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर भागात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे १६ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश पंडीत कोष्टी (वय ४७, अनुपम सोसायटी,मुक्ताई हॉस्पिटल जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कोष्टी कुटूंबिय घरात नसतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटीतील चार ग्रॅमच्या सोन्याच्या मनी मंगळसूत्र, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा सुमारे १६ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.