विशेष प्रतिनिधी, नाशिक
आनंदवल्लीतील रमेश मंडलिक या वृद्धाच्या हत्या प्रकरणातील फरार भूमाफिया आणि रम्मी राजपूत याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. जमीन बळकावण्यासाठी भूमाफियांच्या टोळीने नियोजनपूर्वक पध्दतीने वृध्दाची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी भूमाफियांविरोधात प्रथमच मोक्कांतर्गत कारवाई केली असून, या टोळीतील मास्टरमाईंड रम्मी राजपूतसह त्याचा साथीदार जगदीश मंडलिक फरार आहे.
गंगापूर पोलिस ठाण्यात रम्मी राजपूतसह २० संशयितांंविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या भूमाफिया टोळीवर शहर पोलीसांनी मोक्कान्वये कारवाई केली आहे. गुन्हा उघडकीस आल्यापासून रम्मी आणि त्याचा साथिदार जगदीश त्र्यंबक मंडलिक पसार झाला आहे. या घटनेत गुन्ह्याचा कट रचणे, रमेश मंडलिक यांची हत्या करणे, त्याचे नियोजन करणे आदी सर्व प्रमुख कारणांमागे रमी आणि जगदीशच मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. मात्र, मंडलिक यांच्या हत्येचे धागेदोरे मिळण्यास सुरूवात झाल्यापासून ते दोघेही फरार आहे. मोक्का प्रकरणाचा तपास करणा-या सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी फरार संशयितांच्या अटकेसाठी नाशिक जिल्हा न्यायालयातून स्टॅण्डींग वारंट मिळवले आहे. फरार असलेल्या आरोपींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पोलिसांनी रम्मी आणि जगदीश या दोघा संशयितांच्या मालमत्तेची माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली आहे. सदर गुन्ह्यात हे दोघे संशयीत हाती न लागल्यास पोलिस प्रशासनाकडून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहे. फरार आरोपीची मालमत्ता जप्तीच्या हालचाली सुरू झाल्याने गुन्हेगाराचे धाबे दणाणले आहेत.
….