भामट्या महिलांनी चार लाखाचे दागिने केले लंपास
नाशिक – सराफ बाजारात दुकानदाराचे लक्ष नसल्याची संधी साधत भरदिवसा भामट्या महिलांनी सराफी पेढीतून तब्बल चार लाख रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तीस सोन्याचे टॉप चोरट्या महिलांनी चोरून नेले आहे.
संजय पुंडलिक दंडगव्हाळ (रा.सराफ बाजार) यांनी या चोरीची तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दंडगव्हाळ यांचे सराफ बाजारात भागिरथी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ते आपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. दागिणे खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या तीन भामट्या महिलां व एक लहान मुलीने दंडगव्हाळ मोबाईलवर बोलत असल्याची संधी साधून काऊंटरमधील तब्बल ४ लाख रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून त्याआधारे पोलीस चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक बस्ते करीत आहेत.
……
दुचाकीस्वार भामट्यांनी मोबाईल हिसकावून नेला
नाशिक : सातपूर औद्योगीक वसाहतीत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव हिरामण कुरकुटे (१९ रा.खांदवेनगर,सातपूर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. कुरकुटे बुधवारी (दि.९) कामानिमित्त औद्योगीक वसाहतीत गेला होता. सिएट कंपनीकडून तो एबीबी कंपनीच्या दिशने मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून भरधाव आलेल्या त्रिकुटापैकी एकाने त्याच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.