नाशिक : सरळ सेवा भरती परिक्षेसाठी बसलेल्या दोघांकडे मोबाईल मिळून आल्यामुळे दोघा परिक्षार्थींना अटक करण्यात आली आहे. यातील एक विद्यार्थी डमी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या वतीने परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारावर तपासणी सुरू असतांना हा प्रकार समोर आला. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसला बंदी असतांना दोघा संशयीतांकडे मोबाईल मिळून आले. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार ज्ञानेश्वर श्रीमंत डीघुळे (२२) व योगेश सिताराम बहुरे (२३ रा.बेंबड्याची वाडी,घोडेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून डीघुळे हा चोटीराम सिताराम बहुरे या परिक्षार्थीच्या नावे डमी परिक्षा देण्यासाठी आला असता मोबाईलमुळे त्याचा भांडाफोड झाला. म्हाडाच्या विविध पदांसाठी सरळसेवा भरतीची ऑनलाईन परिक्षा सुरू आहेत. बुधवारी वडाळा पाथर्डीरोडवरील गुरूगोविंद सिंग कॉलेज येथे हा प्रकार समोर आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत. आशिष आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.