नाशिक – येवला – मनमाड रस्त्यावर चार दरोडेखोरांना पकडकण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्यांचा दरोड्याचा कट उधळला गेला. पकडण्यात आलेले दरोडेखोर हे इराणी टोळीचे आहे. सिकंदरअली यावरअली (इराणी,)३८ वर्षे) रा. गेवराई, ता.गेवराई जि.बीड,अलीखान अफजल रोग (इराणी वय ३० वर्षे) रा. नेहरूनगर अकोट फैल अकोला जि. अकोला, रावतअली बहुमायुअली (इराणी वय ३८ वर्षे) रा. अशोक अधिकारनगर झोपडपट्टी अकोला जि. अकोला, सुधीर सिध्दार्थ कांबळे (वय ३०) अशोक नगर, अकोला जि. अकोला अशी या संशयितांची नावे आहे. तर सायम मंजुळकर, अमरावती हा संशयित फरार झाला. या दरोडेखोरांची अंगझडती घेतली असता आवश्यक असलेले हत्यारे, अन्य तत्सम सामग्री तसेच दोन्ही वाहनांच्या किंमतीसह एकूण १० लाख ४७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. येवला तालुका पोलिसांत गुन्हा भादवी कलम ३९९ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येवला तालुका पोलिस करीत आहेत. दरम्यान यां टोळीकडून मोठा कट उघड होण्याची तसेच अन्य क्लिष्ट गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनमाड येवला रोडवरील तांदुळवाडी फाट्या वरील लॉन्स समोर बुधवारी रात्री नाकाबंदी करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांचा रात्री ८.३० वा.या भागात दरोडा किंवा अन्य तत्सम मोठे गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने एक इराणी टोळी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नाकाबंदी अधिक कटाक्षाने करण्याच्या सूचना दिल्या. येवला शहरात २ आयशर ट्रक मध्ये ४ ते ५ इसम दरोडा किंवा मोठा गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने आले असल्याची माहिती पोलिसांनी होती. त्यामुळे ट्रक व त्यातील इसमांची खात्री करून आवश्यक ती कारवाई करण्याचे वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मनमाडच्या दिशेने येवला शहराकडे येणारे वाहने तपासत असतांना रात्री ११ वा. च्या सुमारास एक तांबडया रंगाची एम. एच. ०४ डी के २७७५ क्रमांकाची आयशर येतांना दिसली, तिच्याच मागे तपकीरी रंगावी एमएच ०४ ई वाय ७३२८ क्रमांकाची आयशर येताना दिसली. दोन्ही आयशर गाडयांची तपासणी करतांना एम. एच. ०४ डी के २७७५ मध्ये दोन इसम बसलेले दिसले व एम एच ०४ ई वाय ७३२८ नंबरचे गाडीमध्ये तीन इसम बसलेले दिसले. सदरची गाडी थांबवताच त्यातील एक इसम लागलीच गाडीतून उडी मारून पळून गेला. दोन्ही गाडयामधील उर्वरीत चार इसमाना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता मिळालेली माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले.