चुंचाळेत मुलीचा विनयभंग
नाशिक : इमारतीच्या गच्चीवर घेवून जावून ५० वर्षीय इसमाने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश राऊत (५० रा.घरकुल योजना) असे संशयीताचे नाव आहे. संशयीत आणि मुलगी एकाच भागात राहणारे असून बुधवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास संशयीताने मुलीस गाठून हे कृत्य केले. मुलीस इमारतीच्या टेरेसवर घेवून जावून त्याने विनयभंग केला. यावेळी मुलीने विरोध केला असता संशयीताने शिवीगाळ करीत तिच्याशी अंगलट केले. मुलीने संशयीताच्या ताब्यातून सुटका करून घेत आपले घर गाठून आपबिती कथन केल्याने ही घटना उघडकीस आली असून पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.
….
अल्पवयीन मुलीस पळविले
नाशिक : भारतनगर येथील अल्पवयीन मुलीस एकाने पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस रेकॉर्डवरील तरूणाविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम अयाज काझी (२७ रा.भारतनगर) असे संशयीताचे नाव आहे. संशयीत आणि तक्रारदार महिला एकाच भागात राहणारे असून, गेल्या बुधवारी (दि.२६) संशयीताने महिलेच्या अल्पवयीन मुलीस घरातून बळजबरीने पळवून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.
….
घरात घुसून एकास मारहाण
नाशिक : वखारीतील मजूरांना शिवीगाळ केल्याच्या कारणातून दोघांनी एकास घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना वडाळानाका भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयीतांना पोलीसांनी जेरबंद केले आहे. अमन कुरेशी आणि अफजल कुरेशी (रा.नागसेननगर,वडाळानाका) अशी अटक केलेल्या बापलेकाचे नाव आहे. याप्रकरणी शोभा खानझोडे (रा.शर्मा गॅरेज जवळ,नागसेननगर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.२६) ही घटना घडली. तक्रारदार महिला व तिचे मुले घरात असतांना संशयीत बापलेकांनी तिच्या घरात बळजबरीने प्रवेश करून हे कृत्य केले. अक्षय नामक महिलेच्या मुलास संशयीतांनी वखारीतील कामगारांना का शिवीगाळ केली या कारणातून वाद घालत बेदम मारहाण केली. अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.