नाशिक – गर्दीची संधी साधत गळयातील सोन्याची कंठीमाळ अज्ञात महिलेने केली लंपास
नाशिक : गर्दीची संधी साधत अज्ञात महिला चोरट्यांनी भाविक महिलेच्या गळयातील सोन्याची कंठीमाळ हातोहात लांबविल्याची घटना तिवंधा चौकातील साक्षी गणपती मंदिर भागात घडली. याप्रकरणी भद्राकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली यशवंत खांदवे (५८ रा.सोमवार पेठ,भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली आहे. खांदवे या शुक्रवारी (दि.४) गणेश जयंती निमित्त देवदर्शनासाठी तिवंधा चौकात गेल्या होत्या. साक्षी गणपती मंदिर परिसरात त्या महिलांच्या रांगेत उभ्या असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात महिला चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची कंठी माळ हातोहात लांबविली. अधिक तपास पोलीस नाईक खैरनार करीत आहेत.
किरकोळ कारणातून तिघांनी पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करीत तिच्या पतीस केली बेदम मारहाण
नाशिक : वृंदावननगर भागात किरकोळ कारणातून तिघांनी पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करीत तिच्या पतीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत डोक्यात लोखंडी फावडे मारल्याने महिलेचा पती जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गेश,आक्या व आक्याचा मित्र अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी नागेश तुकाराम पांढरे (३७ रा. शिवमुद्रा चौक,इच्छामणीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीतांनी बुधवारी पतंग उडविण्याच्या नादात पांढरे यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी त्यांची पत्नी समजावून सांगत असतांना संशयीतांनी तिला शिवीगाळ करीत दमदाटी केली. पांढरे आपल्या पत्नीच्या मदतीला धावून गेले असता संशयीतांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून बांधकाम साईटवर पडलेले लोखंडी फावडे डोक्यात मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.
भ्रमणध्वनी दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
नाशिक : मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील भ्रमणध्वनी दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरशाद रईस शहा (२३ रा.मिना ट्रेंडर्स जवळ अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शहा बुधवारी (दि.२) रात्री परिसरातील मेडिकल स्टोअर्स येथे औषधे घेण्यासाठी गेले असता ही घटना घडली. औषधे घेवून ते रस्त्याने फोनवर बोलत घराकडे परतत असतांना महाराष्ट्र वजन काट्यासमोर पाठीमागून आलेल्या शाईन दुचाकीवरील एकाने त्यांच्या हातातील सुमारे १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : शहर आणि परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी शुक्रवारी (दि.४) गळपास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सातपूर औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणा-या प्रेमसागर श्यामनारायण सिंग (५४ रा.सरस्वती निवास,महादेव मंदिराजवळ) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी राकेश सिंग यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत. दुसरी घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. वैभव प्रल्हाद भटकर (२२ रा.दत्तनगर) या तरूणाने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाणी करीत आहेत.