नाशिक – तरूणाच्या क्रेडिट कार्ड मधून तीस हजार रूपये केले ऑनलाईन लंपास
नाशिक – तरूणाच्या क्रेडिट कार्ड मधून तीस हजार रूपये परस्पर ऑनलाईन लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष रामचंद्र वाकोडे (२८ मुळ रा.यवतमाळ,हल्ली माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ,आडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. वाकोडे आडगाव येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरीस असून गेल्या २९ डिसेंबर रोजी ते आपली सेवा बजावत असतांना ९६४४८९०६७९ व ९७७६५००४१९ या क्रमांकावरून भामट्यांनी संपर्क साधला होता. क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. ही लिंक ओपन करून त्यात क्रेडिट कार्डची गोपनिय माहिती भरण्यास भाग पाडले. यानंतर भामट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून २९ हजार ९९९ रूपये परस्पर ऑनलाईन काढून घेतले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख करीत आहेत.
…….
नाशिक – संत कबीर नगर भागात पार्क केलेली तवेरा कार समाजकंटकानी पेटवून दिली
नाशिक – गंगापूररोडवरील संत कबीर नगर भागात पार्क केलेली तवेरा कार समाजकंटकानी पेटवून दिली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय शेषराव वाघमारे (४३ रा. सम्राट कॉलनी बुध्दविहार जवळ संत कबीर नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार वाघमारे यांची तवेरा (एमएच १७ टी १३०३) कार गुरूवारी (दि.३) परिसरातील दिलीप धवसे यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत लावली असतांना अज्ञात समाजकंटकांनी तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिली. या घटनेत कार जळून खाक झाली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.