कोयताधारी तडीपार जेरबंद
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे एक वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना कोयता घेवून फिरणा-या तडीपारास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई कामटवाडे भागातील माऊली लॉन्स परिसरात करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाळू वाघ (२५ रा.वाघ मळा,शुभम पार्क जवळ कामटवाडे) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. वाघ याच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्याने त्यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच तो बुधवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास माऊली लॉन्स भागात येणार असल्याची माहिती मिळाली पोलीसांनी सापळा लावला असता तो धारदार कोयत्यासह पोलीसांच्या जाळयात अडकला. याप्रकरणी पोलीस शिपाई तुळशिराम जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.
….
टोळक्याकडून बापलेकास मारहाण
नाशिक : तुम्ही आमच्या गल्लीतील मुलांना नडतात या कारणातून पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांनी बाप लेकांना बेदम मारहाण केल्याची घटना वडाळानाका भागात घडली. या घटनेत गुन्हेगाराने कोयत्याचा वापर केल्याने दोघे जण जखमी झाले असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश राजेंद्र शिंदे (२२ रा.शिवदर्शनअपा.श्रीराम चौक,इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी अमन अफजल कुरेशी (२० रा.कुरेशीनगर,वडाळानाका) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वडाळा नाका येथील शर्मा गॅरेज भागात संशयीत शिंदे व त्याच्या तीन चार साथीदारांनी अमन कुरेशी यांचे वडिल अफजल कुरेशी भाऊ लईक कुरेशी आणि आसिफ शेख आदींना गाठून तुम्ही आमच्या गल्लीतील मुलांना नडतात. थांबा तुम्हाला दाखवतो असे म्हणून बापलेकांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना दगड विटानी मारहाण केली. यावेळी दोघा भावांना शिंदे याने कोयत्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
….