नाशिक – हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या दोघांना मंगळवारी पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गणेश बाबुराव धात्रक (२८ रा.सृष्टी सोसा.एरिगेशन कॉलनी,म.बाद शिवार) व निखील अनिल बेग (२५ रा.कथडा,भद्रकाली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. मंगळवारी शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार संशयीत गणेश धात्रक यास पेठरोडवरील लक्ष्मणनगर भागात बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी युनिटचे पोलीस नाईक प्रदिप म्हसदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा संशयीत निखील बेग यास द्वारका परिसरातील टॅक्टर हाऊस भागात अटक करण्यात आली. संगम बार समोर तो आल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीसांनी त्यास सापळा रचून जेरबंद केले. याप्रकरणी अंमलदार संजय पोटींदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भोईर करीत आहेत.