नाशिक – बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून तब्बल सव्वा आठ लाख रुपये रोख रुपये लंपास केले आहे. जेलरोडच्या दसक परिसरात ही घटना घडली. या घटनेतील चोर सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी कृष्ण दत्तात्रय आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसकच्या कृष्णा नगर येथे असलेल्या माऊली पार्क या सोसायटीतील फ्लॅट नंबर ९ चा दरवाजाला असलेले कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये असलेल्या मंदिराच्या दानपेटीतील २५ हजार रुपये तसेच बेडरूममधील कपाटातून तब्बल ८ लाख रुपये रोख अशी सव्वा आठ लाख रुपयाची रक्कम लंपास केली. या घटनेबाबत नाशिकरोड पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांसह पोलिस निरीक्षक गणेश न्याहाळदे, सपोनि शेळके, गोसावी आदीनी घटनास्थळी भेट दिली.