नाशिक – गंगापूररोड परिसरात दारू दुकान फोडून चोरट्यांनी महागड्या वाईनसह गल्यातील १३ हजार ५०० रूपयांची रोकड असा सुमारे ९८ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी रविंद्र विठ्ठल साळी (रा.इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूररोड येथील स्टर्लीन अपार्टमेंटच्या गाळा नं.४ ते ६ येथील समाधान वाईन मार्ट या दारू दुकानाचे साळी हे व्यवस्थापक आहेत. शनिवारी रात्री साळी दुकान वाढवून घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाच्या ग्रीलच्या दरवाजाच्या लोखंडी पट्या उचकटून शटरचे कुलूप तोडले. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी जॉनी वॉकर,आर्ट बर्ग,कावा लॅन्ड,ग्लेन मोरंजी लासंटा,ग्लेन ग्रान्ट आणि विविध प्रकारच्या महागड्या वाईनच्या बाटल्या व रोकड असा ९८ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक एस.एस.भिसे करीत आहेत.