नाशिक : जुने नाशिक येथे भुरळ घालत वृध्देच्या अंगावरील दागिणे व रोकड घेवून भामटे पसार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सात हजाराच्या रोकडसह सोन्याची पोत चांदीचे कडे,बांगड्या असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या चोरीप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी अशिक्षीत पणाचा फायदा उचलत वृध्देला विश्वासात घेतले. त्यानंतर ताब्यातील रोकड व दागिणे असा सुमारे २९ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज लंपास केला.
या चोरीप्रकरणी शकुंतला भिकाजी गायकवाड (८० रा.मोठा मातंगवाडा,महालक्ष्मी चाळ पाठीमागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड या रविवारी बागवानपुरा येथील खासगी दवाखान्यात जात असतांना ही घटना घडली. सिफा दवाखाना नजीकच्या रॉबिन बिस्कीट कारखान्याच्या पडिक जागे जवळून त्या पायी जात असतांना एका इसमाने त्यांना पडिक जागेजवळ बोलावून घेतले. यावेळी त्याने भुरळ घालत वृध्देस अंगावरील दागिणे काढण्यास भाग पाडले. ही बाब लक्षात येताच वृध्देने स्थानिकांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. या चोरी प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.