नाशिक – भोसला मिलिटरी स्कूलमागील संत कबीर नगरमधील बौद्ध विहाराजवळ कोर्टातून केस का मागे घेत या कारणावरुन झालेल्या वादात एका तरुणाने सुन व सास-यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अमन दयाळ जाधव (वय २१) अटक केली आहे. या घटनेत सुनेने दाखवलेल्या प्रसंगावधानमुळे सासरे बचावले आहेत. पण, दुस-या वारमध्ये त्यांच्या बोटाला इजा झाली. या हल्यात सुनेच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. शनिवारी रात्री हा प्राणघातक हल्ला झाला. या घटनेत सुन स्वाती सुमेद वाघमारे (वय २२) व सासरे विजय शशीराव वाघमारे (रा. संत कबीरनगर) हे दोघे जखमी झाले आहेत.
स्वाती सुमेद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हल्लेखोर अमन दयाळ जाधव (वय २१) यांची आई स्वाती ही माझे सासरे विजय वाघमारे यांच्याशी कोर्टातून केस का मागे घेत नाही या कारणावरून वाद घालत होती. यावेळी अमन हा कोयता घेऊन आला. त्यानेही वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सासरे विजय वाघमारे यांच्यावर पहिला हल्ला केला. पण, मी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, जाधव यांनी माझ्यावर वार केला. त्यामुळे माझ्या डोक्याला जबर दुखापत झाली. अमनने दुसरा वार विजय वाघमारे यांच्यावर केला. त्यात त्यांच्या बोटाला इजा झाली. या प्रकरणी स्वाती वाघमारे यांच्या तक्रारी नंतर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व अमन जाधव याला अटक केली. सहायक निरीक्षक एन.व्ही. बैसाणे पुढील तपास करत आहेत.