नाशिक : सराफी पेढीत मालकाच्या कॅबीनमधून १ लाख ८ हजाराचे दागिने नोकराने केले लंपास
नाशिक : साफसफाई करण्याच्या बहाण्याने नोकराने सराफी पेढीत मालकाच्या कॅबीनमधून दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. मयुर बाविस्कर असे संशयीत नोकराचे नाव आहे. याप्रकरणी संदिप रामचंद्र देशपांडे (रा.पवननगर,सिडको) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशपांडे यांचे शरणपूररोडवरील टिळकवाडी भागात प्रशिध्द सराफी पेढी आहे. या पेढीत संशयीत कामास असून गेल्या बुधवारी सकाळी ही घटना घडली. देशपांडे आपल्या कॅबीनमध्ये नसतांना संशयीत साफसफाई करण्यासाठी तेथे गेला होता. यावेळी त्याने मालकाच्या कॅबीनमधील ड्राव्हरमध्ये ठेवलेले मंगळसुत्र,सोन्याची लगड,अंगठी,टॉप्स,चांदीचा ग्लास,जोड असा सुमारे १ लाख ८ हजार ३०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकविपुरे करीत आहेत.
ठसका लागल्याने ७५ वर्षीय वृध्दाचा मृत्यु
नाशिक : जेवण करीत असतांना ठसका लागल्याने ७५ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. ही घटना जेलरोड भागातील बोराडे मळा परिसरात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भास्कर भिवाजी जाधव (रा.राहूल नगर,पंचक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जाधव शुक्रवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात जेवण करीत असतांना ही घटना घडली. जेवत असतांना अचानक ठसका लागल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्यामुळे कुटूंबियांनी तातडीने त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.