नाशिक – आरटीओ कार्यालय परिसरात भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार
नाशिक – पेठरोडवरील आरटीओ कार्यालय परिसरात भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत पंचवटी येथील अश्वमेधनगर येथील जनार्दन अरूण भालेराव हा मजूर ठार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करुन चालक गौरव बापू गोसावी (रा.प्रभातनगर,म्हसरूळ) या अटक केली आहे. भालेराव शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. फुलेनगर येथून अश्वमेधनगरच्या दिशेने ते पायी जात असतांना आरटीओ समोरील भारत पेट्रोल पंप परिसरात पाठीमागून येणा-या महिंद्रा कंपनीच्या जितो प्लस (एमएच १५ एचएच ३५१६) या भरधाव मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात भालेराव गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी त्यांचा भाचा रविंद्र शिरसाठ (रा.मेहरधाम,पेठरोड) याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांनी पळवली.
नाशिक : पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. या दुचाकीच्या डिक्कीत महागडे तीन मोबाईल होते. ही घटना औद्योगीक वसाहतीतील महिंद्रा सोना कंपनी परिसरात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार संजय बोढाई (रा.होळी चौक,आडगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोढाई रविवारी (दि.२३) कामानिमित्त सातपूर औद्योगीक वसाहतीत गेले होते. महिंद्रा सोना या कारखान्याच्या प्रवेश द्वाराजवळ त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ डीजी ८०२६ पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. दुचाकीच्या डिक्कीत तीन मोबाईल होते. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.