नाशिक – बेकायदेशीर रित्या कंपनीची माहिती ई मेलच्या माध्यमातून चोरी करून स्व:ताचा व्यवसाय सुरु करणा-या कामागारा विरुध्द सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिन्डलर इंडिया प्रा.लि. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कंपनीची गोपनीय माहिती ई मेलच्या माध्यमातून चोरी करून स्व:ताचा व्यवसाय सुरु केला. त्यातून या कामगाराने ग्राहकांना सेवा पुरविणे सुरू केले. हा कामगार शिन्डलर या कंपनीत नोकरीस होता. त्याने कंपनीचे गोपनिय माहिती बेकायदेशीररित्या स्व:तच्या वैयक्तीक ईमेलवर फॉरवर्ड करून हा गंडा घातला. गोपनिय माहितीच्या आधारे स्व:ताच्या फायद्यासाठी कंपनीच्या नावाखाली ग्राहकांना सेवा पुरवून पैसे मिळविले. ४ जानेवारी २०११ ते ८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान संशयीताची तोतयागिरी सुरू होती. कंपनीच्या ग्राहकांची संख्या रोडावल्याने ही घटना उघडकीस आली असून, ही बाब निदर्शनास येताच कंपनीने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत. या प्रकरणी अमोल अशोकराव जाधव (३५ रा.कैलासनगर,औरंगाबादरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.