नाशिक : दिंडोरी रोडवरील लामखेडे मळा भागात एकाच सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली समाजकंटकांनी पेटवून दिल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. बुधवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी दिक्षीत आणि गांगुर्डे यांचे आर्थिक नुकसान व्हावे या हेतूने हे कृत्य केले. मध्यरात्री अज्ञातांनी पार्किंगमध्ये लावलेल्या एमएच १७ एडी ८५५८,एमएच १४ के २९२८ व एमएच १५ जीएस ५५१५ या दुचाकींवर प्रज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्या. याप्रकरणी सतिष दत्तात्रेय दिक्षीत (रा.धनलक्ष्मी अपा.सी विंग,लामखेडे मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. दिक्षीत यांच्या दोन व नितीन शंकर गांगुर्डे यांची एक अशा तीन मोटारसायकली अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्या. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.