नाशिकरोड – लष्करी जवानाच्या वृद्ध आईची सोन्याची पोत अज्ञात दुचाकी वरील तरुणांनी ओरबडून नेल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लष्करात जवान असलेल्या विक्रांत वाजे यांच्या मातोश्री श्रीमती सविता दिलीप वाजे या बिटको चौकातील महाराष्ट्र बँकेत कामानिमित्त आल्या होत्या. बँकेचे काम आटोपून रस्त्याने घरी पायी जात असतांना चोरट्यांनी त्याचे पोत ओरबडून नेली.
काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या एकाने सोन्याची पोत बळजबरीने ओरबडून तो बिटको चौकाकडे पळून गेला. वाजे यांनी अज्ञात दुचाकीवर आलेल्या इसमांविरुद्ध २१ हजार रुपये किमतीची सोन्याचे मणी व पेंडल असलेली सात ग्रॅम वजनाची पोत ओरबडून नेल्याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. या चोरीचा नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक करीत आहे. घटनेची माहिती समजतात नाशिकरोड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व पथकाने घटनास्थळी भेट घेऊन गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.