देवळाली कॅम्प येथे दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून तीन जणांनी केली एकास बेदम मारहाण
नाशिक : देवळाली कॅम्प येथे दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून तीन जणांनी एकास बेदम मारहाण केली. ही घटना सिंध्दी पंचायत हॉल भागात घडलेल्या या घटनेत संशयीतांनी फरशीचा तुकडा मारून फेकल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाण प्रकरणाची अभिषेक राजू ससाणे (२५ रा.चौधरी मळा,शिंगवे दारणा रोड,संसरी) या युवकाने तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी देवळाली कॅम्प येथील सिंधी पंचायत हॉल जवळून जात असतांना आदित्य या तोंड ओळख असलेल्या तरूणासह त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी दारू सेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी केली. मी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. या झटापटीत माझी गळय़ातील सोनसाखळी तुटून गहाळ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला
नाशिक – वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला गेल्या आहे. याप्रकरणी पंचवटी,नाशिकरोड व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हिरावाडीतील राजू पंडित दौडे (रा.जोशी कॉलनी,हिरावाडी) हे सोमवारी (दि.२४) गोदाघाटावर गेले होते. रामकुंड येथील साईबाबा मंदिराजवळ त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ सीबी ९३०० पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड येथील देवीचौकात घडली. निखील अशोक डोंगरे (रा.भगूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डोंगरे गेल्या सोमवारी (दि.१७) नाशिकरोड येथील देवीचौक भागात गेले होते. नवले चाळी कडे जाणा-या मार्गावर त्यांनी आपली अॅक्टीव्हा एमएच १५ एफके ३५३१ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत. तर सिडकोतील सुखदेव तुकाराम पवार (रा.शिवशक्ती चौक) यांची स्प्लेंडर एमएच १५ एएल ९२६५ गेल्या ३१ डिसेंबर रोजी त्रिमुर्ती चौकातील बँक ऑफ बडोदा शाखेसमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत.