नाशिक – जेलरोड भागात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री चार घरे फोडली
नाशिक : जेलरोड भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, एकाच रात्री धुमाकूळ घालत भामट्यांनी परिसरातील चार घरे फोडली. त्यातील एका घरातून ४३ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले असून उर्वरीत घरमालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या मुद्देमालाबाबत माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार रामभाऊ आव्हाड (रा.शिल्पधाम सोसा.सिध्दार्थ नगर,जुना सायखेडा रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. आव्हाड कुटूंबिय शुक्रवारी (दि.२१) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे व बारा हजाराची रोकड असा सुमारे ४२ हजार ३५० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याच वेळी चोरट्यांनी आव्हाड यांच्या बिल्डीग मधील पांडूरंग साबळे,अॅड. प्रज्ञा कर्डक व प्रदिप लाघवे यांचेही घर फोडल्याचे समोर आले असून अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोड करीत आहेत.
नाशिक – रस्त्याने पायी जाणा-या तरूणास त्रिकुटाने केली मारहाण
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या तरूणास त्रिकुटाने विनाकारण मारहाण केल्याची घटना आगरटाकळी येथे घडली. या घटनेत फरशीचा तुकडा फेकून मारल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश उर्फ सोनू दादू आहिरे व त्याचे दोन साथीदार अशी तरूणास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी कमळाबाई म्हैसधुने (७० रा.समतानगर,आगरटाकळी) या वृध्देने तक्रार दाखल केली आहे. कमळाबाई यांचा मुलगा शरद वामन म्हैसधुने (३५ रा.सदर) हा शनिवारी (दि.२२) रात्री आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. समतानगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ तिघांनी त्यास गाठले यावेळी संशयीतांनी कुठलेही कारण नसतांना म्हैसधुने यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच म्हैसधुने याने कशी बशी सुटका करीत पळण्याचा प्रयत्न केला असता संशयीतांनी त्याच्या डोक्यात व तोंडावर मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु
नाशिक : राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. ही घटना अमरधामरोडवरील कुंभारवाडा भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. संतोष मदन वाडेकर (४२ रा.शितळादेवी मंदिर शेजारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाडेकर हे रविवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या कानास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार राऊत करीत आहेत.