नाशिक – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजीनगर शाखेत मदत करण्याच्या बहाण्याने दोघांना ५० हजाराला गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या फसवणूक प्रकरणी नमिता सुरेंद्र पगारे व ललीत दीपचंद साखला यांनी स्वतंत्र तक्रारी दिल्या आहे. ललीत दीपचंद साखला हे एटीएममधून पैसे काढत असताना मदतीचा बहाणा करत १४ हजार रुपये हातचलाखीने काढून घेतले. तर नमिता सुरेंद्र पगारे या बोधलेनगर परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या शिवाजीनगर शाखेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी खात्यातून एक लाख रुपये काढले. रोखपालाने ५०० रुपयांचे दोन बंडल दिले. पगारे या नोटा मोजत असताना दोन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. बनावट नोटा येतात. बंडल नीट बघून घ्या, असे सांगून मदतीचा बहाणा करत ५०० रुपयांच्या ७२ नोटा असे ३६ हजार रुपये हातोहात लंपास केले. या दोन्ही प्रकरणात मुंबई नाका पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.