नाशिक – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिली
नाशिक : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा भागात पेटवून दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल सर्जेराव म्हस्के यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. म्हस्के यांची युनिकॉर्न मोटारसायकल एमएच १५ एचके ६९९० सोमवारी त्याच्या घरासमोर पार्क केलेली असतांना अज्ञात समाजकंटकाने ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली. या घटनेत दुचाकीसह तक्रारदार राहत असलेल्या दोन खोलीचे दरवाजांचेही नुकसान झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक – हद्दपारीची कारवाई केलेले असतांना शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण सुखलाल गुंजाळ (२३ रा.नवनाथनगर,पेठरोड) असे अटक केलेल्या संशयीत तडिपाराचे नाव आहे. गुंजाळ याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच रविवारी रात्री तो मालेगाव स्टॅँण्ड भागात मिळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई अंबादास केदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भोईर करीत आहेत.