नाशिक – सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपुरमध्ये निलेश बाळासाहेब सोनवणे या ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी निखिल भावले याच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार निलेशच्या आई व भावाने दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, निलेश याने भावले यांच्याकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र यासाठी भावले वारंवार त्रास देत होता. काही दिवसांपूर्वी त्याने निलेशची दुचाकी ओढून नेली होती. या सर्व कारणांमुळे निलेश हा नैराश्यात होता. या घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर कर्जाच्या नैराश्येतून त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बेकायदा कर्ज देऊन कर्ज वसुली साठी तगादा लावला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मयत निलेशची आई व भावाने यांसंदर्भांत तक्रार दाखल केल्यानंतर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.