नाशिक – भुजबळ फार्मबाहेर पहाटे ‘काळी रांगोळी’ काढून निषेध नोंदवणा-या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ ही काळी रांगोळी काढण्यात आली होती. या प्रकरणी कलम १४४ सीआरपीसी प्रमाणे काढलेल्या आधी सूचनेचे उल्लंघन केले म्हणून कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील निष्पन्न आरोपीविरुद्ध कलम १०७ सीआरपीसी प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे भाजप युवा मोर्चाचे महानगर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, युवती शहराध्यक्ष साक्षी दिंडोरकर, संदीप दिंडोरकर यांच्यासह अन्य मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ विधेयक मागे घ्यावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून विद्यापीठ बचाव आंदोलन केले जात आहे. काळी रांगोळी काढणे हा आंदोलनाचाच एक भाग होता.