नाशिक : बांधकाम ठेकेदाराविरुध्द दोन मजूरांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लालूबाबू असर्फी पंडित असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर भागात गेल्या रविवारी दुरस्तीच्या कामासाठी बांधलेल्या पहाड तुटल्याने ही दुर्घटना घडली होती. या घटनेत गंगासागर सनेही राजभर (४६ रा.गौतमनगर) यांचा प्रथम तर काजल लल्लू कोल (१८ रा.तपोवनरोड) या मजूर महिलेचा मृत्यु झाला. यात राजभर या मजूराच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याच दिवशी तर काजल कोल या महिलेचा दोन दिवसांनतर उपचार सुरू असतांना मृत्यु झाला. ही घटना घडली होती. संशयीत ठेकेदाराने सुरक्षेसाठी आवश्यक असलेले हेल्मेट,सेफ्टी बेल्ट आदी साहित्य परिधान करण्यास न देता त्यांच्याकडून उंचावर दुरूस्तीचे बांधकाम करून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले असून ठेकेदाराने दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणा केल्याने कामगारांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत पोलीसांनी संशयीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.