नाशिक – स्वस्तात घर घेवून देण्याचे आमिष दाखवून दोघा महिलांना तब्बल ४२ लाख ६३ हजार रूपयांना दोन भामट्यांनी गंडा घातला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज भोसले उर्फ सतिश उर्फ विरेंद्रसिंह बाळासाहेब भोसले असे वेगवेगळी नावे धारण करुन फसवणूक करणारे हे दोन जण आहे. याप्रकरणी उत्तरा बाबुलाल कुमावत (रा.गांधीनगर पाठीमागे) या महिलेने तक्रार दाखल केली आहे.
कुमावत यांची नोव्हेंबर २०२० मध्ये या दोघांची ओळख झाली होती. बहिणीचे पैठणी साड्यांचे शोरूम आहे. सुंदर मॉडेलच्या माध्यमातून साड्याची जाहिरात करण्यासाठी शुटींग करायची असल्याचे सांगून त्याने सदर महिलेशी ओळख वाढविली. त्यावेळी त्याने मंत्रालयीन आणि शासकिय अधिका-यांशी ओळख असल्याचे भासवून हा गंडा घातला. मंत्रालयातील मित्रांच्या सहाय्याने महिला व तिची भावजयी कविता परदेशी यांना पंतप्रधान योजनेतून गंगापूररोड सारख्या भागात स्व:स्तात अनुक्रमे १८ व १६ लाख रूपयात घर घेवून दाखविण्याचे आमिष दाखविले. १ नोव्हेंबर २०२० ते ४ डिसेंबर २०२१ या काळात त्याने तक्रारदार महिलेकडून १६ लाख ८९ हजार ६०० रूपये आणि साडे सहा तोळे वजनाच्या दोन सोनसाखळय़ा तसेच ट्रेंडिग व्यवसायासाठी आयफोन असा सुमारे २१ लाख ४५ हजार १०० रूपयांचा ऐवज घेवून गेला. तर भावजयी परदेशी यांनाही वेगवेगळी कारणे सांगून भामट्याने फोन पे – गुगल पे आणि बँकेतून सुमारे २१ लाख १८ हजार असा सुमारे ४२ लाख ६३ हजार १०० रूपये उकळले. अनेक दिवसांपासून संशयीताने संपर्क तोडल्याने हा प्रकार पोलीसात गेला असून, विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ए.बी.पाटील करीत आहेत.