नाशिक – रेशन देण्याचा बहाणा करून ७२ वर्षीय वृध्देची फसवणूक; चोरट्यांनी लंपास केले ४८ हजाराचे दागिणे
नाशिक – रेशन देण्याचा बहाणा करून बोळीत घेवून जात दोघांनी ७२ वर्षीय वृध्देची दिशाभूल करून सुमारे ४८ हजाराचे दागिणे लंपास केले. ही घटना देवी चौकात घडली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणी मंजूळाबाई दिपचंद मरसाळे (रा.सरस्वतीनगर,पंचकगाव) या वृध्देने तक्रार दाखल केली आहे. मरसाळे या सायंकाळच्या सुमारास देवी चौकातील शिंदे यांच्या दुकानात किराणा खरेदी करण्यासाठी पायी जात असतांना ही घटना घडली. विशाल मॉल भागात भेटलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना मोफत रेशन देण्याचा आामिष दाखवून समोरील निर्जन बोळीत नेले. या ठिकाणी दिशाभूल करून त्यांच्या अंगावरील सुमारे ४८ हजार रूपये किमतीचे दागिणे घेवून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.
हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी केली अटक
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी अटक केली. ही कारवाई मल्हारखान झोपडपट्टीत करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज राजू आहिरे (२१ रा.मल्हारखान झोपडपट्टी,गंगापूररोड) असे अटक केलेल्या तडिपाराचे नाव आहे. आहिरे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिमंडळ १ उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. मंगळवारी (दि.११) तो आपल्या घरात असल्याची माहिती सरकारवाडा पोलीसांना मिळाली असता त्यास जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश वायकंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.