नाशिक : कॅनडा कॉर्नर येथील मिशन मळा भागात मोटारसायकल चोर पोलीसांच्या हाती लागला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी साडे चार लाख रूपये किमतीच्या सात मोटारसायकली हस्तगत केल्या आहे. सटाणा व लखमापुर येथून त्याने चोरी केल्याची कबूली त्याने दिली आहे. या चोरट्याच्या अटकेमुळे गंगापूर दोन, अंबड दोन व सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई गंगापूर पोलिसांनी केली आहे.
शहरात वाहन चो-यांचे प्रमाण वाढले आहे. पण, हे वाहन चोरणारे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. आता आरोपी सापडल्यामुळे या चोरीला काहीसा आळा बसणार आहे. या घटनेत पोलीस नाईक मोहिते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटा पोलीसांच्या हाती लागला. कॅनडा कॉर्नर येथील मिशन मळा भागात चोरटा असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सापळा लावून अनिकेत नंदलाल अहिरे (२२ रा.मिशनमळा,कॅनडा कॉर्नर) या चोरट्यास जेरबंद केले.