नाशिकरोड – दोन वर्षे फरार असलेला संशयित अजय राजू वाघेला या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट-दोनच्या पथकाने गजाआड केले आहे. या गुन्हेगारांकडून चोरीच्या चार मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहे. हा गुन्हेगार मध्यवर्ती कारागृहात असताना १६ मे २०२० रोजी पसार झाला होता. त्यानंतर दोन वर्षे सातत्याने घरे बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अशा सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्हेगारांविरुद्ध २३ गुन्हे दाखल आहेत. त्यातील तब्बल पाच गुन्ह्यात तो वाँटेड होता. फरार झाल्यानंतर अजय वाघेला हा मोटारसायकल चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता अजय वाघेला याने नाशिकरोड, इंदिरानगरसह घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरल्याची कबूली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.