नाशिक – जेलरोड परिसरात चोराने चोरी केलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने परत केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. या चोराने चोरलेले दागिने तर परत केले पण, चिठ्ठीद्वारे माफी सुध्दा मागीतली. या चिठ्ठीत चोराने ‘सॉरी सर मला माफ करा’ असे लिहले आहे.चोराच्या या चिठ्टीमुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे.
जेलरोड परिसरात राहणाऱ्या शरद साळवे यांच्या घरातून शनिवारी तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्यांनी याबाबत चोरी झाल्याची तक्रार जेलरोड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या चोरीचा तपासही सुरू केला होता. दरम्यान घटनास्थळी पोलीस शोध घेत असताना साळवे यांच्या घराच्या छतावर चोरीला गेलेल्या सोन्याची बॅग आणि त्यासोबत एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत चोराने ‘सॉरी सर मला माफ करा’अशी लिहून चोरी केल्याबद्दल माफी मागितली आहे.