नाशिक : २१ वर्षीय युवतीचा दुचाकीने पाठलाग करुन तिचा बळजबरीने हात धरत अपहरण करण्याची घटना पंचवटीतील पेठफाट्यावर रविवारी रात्री घडली. पण, पायी जाणा-या या युवतीने आरडाओरड केल्याने या दोन तरुणांचा अपहरण करण्याचा डाव फसला. या तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या काकांनी धाव घेत गुंडांच्या तावडीतून तिची सुटका केली. त्यानंतर पीडित मुलीच्या काकांनी एका संशयित गुंडाला आवळून पकडून ठेवले तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला. नागरिकांनी पोलिसांना माहिती काळविताच घटनास्थळी पोलीस पोहचले आणि त्यांनी एका संशयितास ताब्यात घेत वाहनात डांबले. त्याच्या फरार साथीदारासदेखील रात्री ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात पीडित युवतीने तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.