नाशिक – कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमताने जवळपास ५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पेठ तालुका पोलीस ठाण्यात १६ अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
या गैरप्रकाराबाबत योगेंद्र ऊर्फ योगेश सुरेश सापटे (रा. हेदपाडा, एकदरे, ता. पेठ, जि. नाशिक) यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
२०११ ते २०१७ या कालावधीत शासनाच्या विविध योजना मंजूर करून व निविदा काढून त्यात हा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. या घोटाळयात अधिका-यांनी फिर्यादी यांच्याकडून निविदा भरून घेतल्या. त्यानंतर शंभर रुपयांच्या कोर्या स्टॅम्प पेपरवर तिकीट लावलेल्या ५० कोर्या पावत्यांवर, कोर्या चेकवर सह्या घेऊन त्यांचा गैरवापर केला. त्याचप्रमाणे खोटी कागदपत्रे बनवून, खोटे दस्तऐवज नोंद करून फिर्यादी सापटे व साक्षीदारांच्या नावाने परस्पर ३ कोटी १७ लाख ४ हजार ५०४ रुपयांची रोकड काढून घेतली. याच कालावधीत पेठ तालुक्याकरिता (Peth Taluka) मंजूर विविध योजनांचे ५० कोटी ७२ लाख ७२ हजार ६४ रुपये परस्पर वापरून लाभार्थी व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे सापटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. हा गुन्हा न्यायालयातील फौजदारी चौकशी अर्जानुसार पेठ पोलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करीत आहेत.
यांनी केले संगनमत
या प्रकरणात संशयित आरोपी नरेश शांताराम पवार, दगडू धारू पाटील, संजय श्यामराव पाटील, विठ्ठल उत्तम रंधे, दीपक पिराजी कुसळकर, दिलीप ज्ञानदेव फुलपगार, कृषी पर्यवेक्षक दिलीप औदुंबर वाघचौरे (रा. सोलापूर), मुकुंद कारभारी चौधरी (रा. उंबरी), किरण सीताराम कडलग (रा. जवळे कडलग), प्रतिभा यादवराव माघाडे (रा. दिंडोरी), राधा चिंतामण सहारे (रा. सुरगाणा), कृषी अधिकारी विश्वनाथ बाजीराव पाटील (रा. परधाडे), अशोक नारायण घरटे (रा. साक्री, जि. धुळे), एम. बी. महाजन (रा. पेठ), सरदारसिंग उमेदसिंग राजपूत (रा. चाळीसगाव) व शीलानाथ जगन्नाथ पवार (रा. मानूर) यांनी संगनमत करून फसवणूक केली आहे.