नाशिकः पोलीसांत तक्रार दिल्याच्या रागातून पतीने पत्नी तसेच १० वर्षीय बालिकेस फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना रविवार (दि.२३) दिपालीनगर येथे घडली. याप्रकरणी बालकांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद राजाराम कांबळे (रा. नागरे नगर, राणेनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सुनिता कांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित प्रमोद कांबळे हा सुनिता यांचा पती असून त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचा राग आल्याने मद्याच्या नशेत असलेल्या प्रमोद याने दिपाली नगर परिसरात पत्नी सुनिता व १० वर्षाची त्यांची मुलगी निशा यांना फायटरच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मारहाण तसेच बालकांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक श्रीवंत करत आहेत.