नाशिक : कामटवाडा भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत निखील पार्क येथील तिन घरे फोडून सुमारे दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज नारायण भावसार (रा.निखील पार्क,कामटवाडा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.२) रात्री अज्ञात चोरट्यांनी निखील पार्क येथील बिल्डींग नंबर २ व ३ मधील भावसार यांच्यासह रविंद्र दत्तात्रेय पाटील आणि सुनिल नाना पाटील यांची तीन घरे फोडली. ही घरफोडी टेहळणी करून झाल्याचे बोलले जात असून तिन्ही कुटूंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयडा तोडून तिघांच्या घरातून सुमारे १ लाख ४८ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत. दरम्यान या भागात चोरी मारीसह घरफोडीच्या गुह्यात वाढ झाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.