नाशिक – भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करत चोरट्यांनी एक लाख रुपयांना गंडा घातला. मुलीच्या फीचे पैसे भरण्यासाठी जेष्ठ नागरिक गेल्यानंतर हा प्रकार घडला. नाशिकरोडमधील दुर्गा उद्यानासमोरील एटीएम व बँकेतील परिसरात याअगोदरही असे प्रकार घडले आहे. येथे ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या काही घटना घडल्या आहे. पण, या फसवणूक करणा-या टोळीला रोखण्यात उपनगर पोलिसांना अद्याप यश आले नाही. या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आनंदा उघाडे (वय ६०, फ्लॅट क्र.३, कैलासजी सोसायटी, जेलरोड) हे मुलीच्या फीचे पैसे भरण्यासाठी दुर्गा उद्यानासमोरील भारतीय स्टेट बँकेत गेले होते. पैसे काढून दुसऱ्या खात्यात भरत असताना एका अनोळखी व्यक्तिने त्यांना हटकले. मी केंद्रात काम करतो, असे सांगून मदतीचा बहाणा केला. खात्यात पैसे टाकून देतो अशी बतावणी करत उघाडे यांना झेरॉक्स आणण्यासाठी बाहेर पाठवले व पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सहायक निरीक्षक भामरे तपास करत आहेत.