नाशिक – बँक खात्याला जोडलेला मोबाईल व ईमेल अकाऊंट हँक करून चोरट्यांनी सात लाख २८ हजार रुपये विविध खात्यात वळते केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल मालाचे होलसेल विक्रेते असणाऱ्या व्यापा-याच्या खात्याबाबत हा प्रकार घडला आहे. या फसवणूकीबाबत मुंबई नाका येथील गायकवाड नगर येथे राहणारे विष्णू विठ्ठलदास गुजराथी यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी मोबाईल व ईमेल हॅक करणारा तसेच ज्या खात्यात रक्कम वर्ग झाली अशा खातेधारकांविरुद्ध भादंवि कायदा कलम ४२० सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदववला आहे. या फसवणूक प्रकरणाचा वरीष्ठ निरीक्षक सूरज बिजली तपास करत आहेत.
असे वळते केले पैसे
विष्णू गुजराथी हे इलेक्ट्रिकल मालाच्या होलसेल विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे बँक ऑफ इंडियामध्ये कॅश क्रेडीट खाते आहे. या खात्याला मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आयडी रजिस्टर केलेला आहे. सायबर चोरांनी मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी हॅक करून खात्यातील सात लाख २८ हजार रुपये विविध खात्यात वर्ग करून घेतले.