नाशिक – शहरातून वाहने चोरी करुन विक्री करणार्या टोळीचा नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रविवारी (दि.२३) अंबडमधून अटक केली. पथकाने चोरट्यांच्या ताब्यातून एक दुचाकी जप्त केली आहे. अभिषेक मनोज प्रसाद (वय २१, रा. शिवाजीनगर, सातपूर), सुमित महादू बागुल (वय १९, रा. कामगारनगर, सातपूर), सुनील महाले (२५, रा. कार्बननाका, सातपूर), रोहन विजय शिंदे (२३, रा. कामगारनगर, सातपूर), निलेश पंढरीनाथ बर्हे (रा.गोंदे दुमाला, ता.इगतपुरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वाहनचोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व त्यांचे सहकारी विविध गुन्ह्यांचे घटनास्थळी भेट देवून चोरट्यांचा शोध घेत होते. दरम्यान, १७ मे रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान ओम रेसिडेन्सी, ध्रुवनगर येथे दुचाकी चोरी चोरटे अंबडमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत पाच जणांना अटक केली. अभिषेक प्रसादच्या ताब्यातून पोलिसांनी ओम रेसिडेन्सी येथून चोरीला गेलेली दुचाकी (एमएच १५- एचजे ७३९१) जप्त केले. पोलीस चौकशीत अभिषेक प्रसाद व सुमित बागुले या दोघांनी दुचाकी चोरल्याचे समोर आले. सुनील महाले, रोहन शिंदे व निलेश बर्हे चोरलेल्या दुचाकीची देवाण-घेवाण करताना एकाच ठिकाणी पोलिसांना मिळून आले. दुचाकी चोरीप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार पथकाने पुढील तपासाठी संशयितांना गंगापूर पोलिसांकडे हस्तांतरित केले.